6 दिवसांत 6.23 लाख शेतकऱ्यांना लाभ, जाणून घ्या पुढचा हप्ता कधी मिळणार
केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना विस्तारत असून देशभरात या योजनेचे तब्बल 11.45 कोटी शेतकरी लाभार्थी आहेत.
मुंबई : केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM-kisan Scheme) विस्तारत असून देशभरात या योजनेचे तब्बल 11.45 कोटी शेतकरी लाभार्थी आहेत. तसेच, फक्त 6 दिवसांत 6 लाख 23 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा झाले आहेत. आगामी काळात या योजनेचा आणखी विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.
सातवा हप्ता 31 मार्चपर्यंत मिळणार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 हजार रुपये टाकले जातात. प्रत्येक हप्त्याला 2000 रुपये याप्रमाणे ही रक्कम वितरित करण्यात येते. यानंतर पुढचा हप्ता 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. संबंधित राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची माहिती पुरवली जाईल, तशी ही रक्कम त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. मागील 6 दिवसांमध्ये मोदी सरकारने आणखी 6,22,969 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरक असणाऱ्या साधनांची खरेदी करण्यास मदत होणार आहे.
1.44 कोटी शेतकरी लाभापासून वंचित
आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र, अजूनही देशात एकूण 1.44 कोटी शेतकरी योजनेद्वारे मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. गरज असलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि पुर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहेत का याची पडताळणी करावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना आगामी हप्ता मिळू शकेल.
आतापर्यंत 11.45 कोटी शेतकऱ्यांना लाभ
या योजनेंतर्गंत आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. त्यांनतरही शेतऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टाकणे सुरुच आहे. ताज्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यापर्यंत या योजनेचा आपतापर्यंत 11.45 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक त्रुट्या असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करुन घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून केले जात आहे.
दरम्यान, या योजनेंतर्गत केंद्र सरकारने मागील 24 महिन्यांमध्ये 1.1 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारने प्रत्येक वर्षासाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलेला आहे. म्हणजेच ही योजना सुरु राहिली तर पुढील 10 वर्षांपर्यंत 7 लाख कोटींची रक्कम देशातील एकूण शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.