राजर्षी शाहू महाराज : दूरदृष्टीचा राजा

महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक, कृषी, शिक्षण, क्रीडा, व्यापार, जलसंधारण यात योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी शंभर वर्षांपूर्वी केलेली उपाययोजना आजही एक आदर्श आहे. राधानगरी धरण हे त्यांच्या दूरदृष्टीचा एक उत्तम नमुना आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यासाठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा', जलसंधारण कामे यासाठी हात राबत आहेत. आजही महाराष्ट्राची परिस्थिती अशीच नजरेसमोर आहे. 'भविष्यात दुष्काळी संकटांचा सामना करावा लागणार असून आताच जलसंधारणाची कामे केली पाहिजेत', ही गोष्ट राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी ओळखली होती. त्यामुळे त्यांनी राधानगरी धरण बांधून केवळ कोल्हापूरचा प्रश्न सोडवला नाही तर जगाला धरणांचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय अनेक तळी, तलाव व कृषीविषयक कामे हाती घेऊन शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, हीच दूरदृष्टी आज कामी आली.
राजर्षी शाहू महाराजांवर महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा पगडा होता. महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकातून आणि इतर पुस्तकांतून शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न मांडला. फुले यांच्यानंतर शाहू महाराजांनी 'सत्यशोधक' कार्य सुरू केले. राजे स्वतःला शेतकरी आणि सैनिक समजत असत. हा त्यांचा मोठेपणा इतर संस्थानिकांनी दाखवला नाही. शाहू महाराजांनी अस्पृश्य निवारण व शैक्षणिक सुधारणा केल्या.
कृषिक्षेत्र सक्षम झाले तरच शेतकरी व पर्यायाने देश समृद्ध होईल, असे त्यांचे विचार होते. त्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतीबरोबर यांत्रिकी पद्धतीची जोड दिली. यासाठी शेतीला बारमाही पाण्याची सोय केली पाहिजे म्हणून तळी, तलाव, विहिरी आणि धरणे निर्माण करण्याची योजना तयार केली. त्यातील राधानगरी धरण तर जननीच ठरले.
कोल्हापूर संस्थानाची समृद्धी, आर्थिक स्थिती आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे लक्षात घेता शाहू महाराज यांनी आखलेली व कार्यान्वित केलेली भव्य राधानगरी धरणाची योजना त्यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे प्रतीक मानली जाते.
शाहू महाराजांचे धोरण आजही कामी येत आहे. महाराष्ट्र आणि कोल्हापुरातील दुष्काळी परिस्थितीत त्यांची मदत होतीच; पण संपूर्ण दुष्काळ निर्मूलन करायचे तर शेतीला शाश्वत पाणीपुरवठा असला पाहिजे हे महाराज जाणून होते. त्यामुळे नद्या, विहिरी आणि तलाव या सर्व घटकांचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग त्यांनी कोल्हापूर संस्थानात केलेला दिसून येतो.
महाराजांनी 1896 चा दुष्काळ सुनियोजित हाताळला होता. यात महाराजांनी स्वतः लक्ष घातले. अन्नधान्य, जनावरांचा चारा, सारामाफी, दुष्काळग्रस्त लोकांना आश्रय, रोजगार म्हणून रस्ते, विहिरींची कामे हाती घेतली.
अतिशय काटेकोरपणे व्यवस्थापन केले; तसेच दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1907 साली राधानगरी धरण बांधण्याचे नियोजन केले. प्रथम संपूर्ण राज्यात दौरा केला. शाहू महाराज यांनी सर एम. विश्वेश्वरैया यांना म्हैसूरवरून पाचारण केले. तज्ज्ञ मंडळीनी फेजिवडे गावाजवळील भोगावती नदीवर धरणासाठी पसंती दिली. युरोपियन धरणतज्ज्ञ यांनी 11 लाख रुपयांचे बजेट मांडले. त्यानंतर महाराजांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.
कारागिरांसाठी वसलेल्या वस्तीला मातोश्रींचे नाव देऊन राधानगरी निर्माण झाली. धरण कामाची सुरुवात झाली असताना पहिल्या महायुद्धाचा चटका भारतालाही सहन करावा लागला. महागाईचा भडका उडाला. त्यामुळे यांत्रिकीकरणावरचा खर्चही वाढला. 1917 सालापर्यंत हा खर्च 14 लाखांवर गेला. अर्थकारण कोलमडले आणि काम बंद करण्याचा निर्णय झाला. पुढे महाराजांच्या मुलांनी छत्रपती राजाराम यांनी उर्वरित कार्य तडीस नेले.
1909 साली प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन 1918 साली ते 40 फुटापर्यंत गेले; यात पाणी संचय सुरू झाल्याने करवीरनगरी सुखावली. पुढे हे काम 1957 साली पूर्णत्वास गेले. महाराष्ट्रातील एक भक्कम धरण निर्माण झाले. दगडी बांधकाम 38.41 मीटर उंची, तर 1,037 मीटर धरणाची लांबी आहे. धरण पाणीसाठा 2,368 लक्ष घनमीटर आहे. यामुळे 59,110 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आणि शेतीला समृद्ध जीवन लाभले.
100 वर्षांपूर्वी राजर्षींनी जलसिंचनाचे महत्त्व जाणले होते. दुष्काळाच्या समस्या जाणल्या होत्या. आपल्या जीवनात अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेले. समाजसुधारणा, अस्पृश्य निवारण, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक कार्याबरोबर व्यापार, तंत्रज्ञान, समृद्ध शेती व सिंचन योजना निर्माण केल्या. छोटेसे राज्य, अल्पसा कर, त्यात ब्रिटिश साम्राज्य अशातही आकाशाला गवसणी घालणारे धरणाचे कार्य पूर्ण झाले. राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी महाराष्ट्रासाठी अनमोल ठेवा आहे. -