मुलांना शाळेची ओढ निर्माण कराय लावणारी बालकविता : सुंदर माझी शाळा मुलांना शाळेची ओढ निर्माण कराय लावणारी बालकविता म्हणजेच गणेश घुले याच्या सुंदर माझी शाळा या बालकवितासंग्रहातील कविता होय. गावाकडच्या आठवणींने व्याकूळ होऊन जाणाऱ्या या कवीचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पाडुळी या खेडेगावात झाला. गावाकडच्या कविता हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून सुंदर माझी शाळा हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे. सुंदर माझी शाळा या संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनास इतरही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. शाळा हीच मुलांच्या जडण घडणीची पहिली इमारत असते. अशा या इमारतीतून असंख्य तारे आपले भविष्य उज्ज्वल करुन घेतात. याची जाणीव मुलांना कवी करुन देतो आहे. मात्र बदलत्या काळात विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांच्यातला हळूहळू दुरावत चालेला संवाद, शिक्षणाचे होत चालेले बाजारीकरण आणि हरवत चालेली नैतिक मूल्ये यावर नेमके भाष्य करणा-या कविता आहेत. या संग्रहात असलेल्या सर्व कवितांचे संगीतमय सादरीकरण श्रीराम पोतदार यांच्या सहकार्याने सध्या महाराष्ट्रात होत आहेत. शाळा, बालसंमेलात यांच्या कवितेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. शाळा आणि शिक्षकांविषयीच्या अभिमान बालमनात फुलवणारा आणि विद्यार्थ्यांचे आत्मबळ वाढवणारी त्यांची ही बालकविता शिक्षकांना अंर्तमुख आणि पालकांना बालपणातील आठवणींचा उजाळाही करून देते. शाळा म्हणजे उज्ज्वल यश संपादन करताना पंखांना बळ देणारी भविष्याची वेधशाळा आहे असे कवी म्हणतो. घेताना उंच भरारी पंखाना बळ देणारी भविष्याची वेधशाळा गं.. सुंदर माझी शाळा गं.. ज्ञानाच्या पावसाने मातीचा हा गोळा घडतो आणि अशा शाळेत विद्येचा मळा फुलू लागतो. भिंतीवरील बोलक्या चित्रामुळे शिक्षणाचा लळा लागतो आहे. शिक्षणामुळे मंगळावर पाणी शोधू तर चंद्रावर घरे बांधू हे केवळ शिक्षण आणि विज्ञानामुळे शक्य आहे. मंगळावर शोधू पाण्याचे झरे चंद्रावर जाऊन बांधूया घरे विज्ञानाचा पडताळा गं .. अज्ञानाचा फोडू डोळा ग.. सुंदर माझी शाळा ग.. हे जीवन खूप सुंदर आहे आणखी सुंदर करायचे आहे तर हाती पुस्तक घेतले पाहिजे. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी साक्षरतेचे पाईक होऊन अज्ञानाच्या अंधाराला दूर पळवून लावूया. असे कवी बालकांना आपल्या कवितेतून सांगतो आहे. सुंदर आहे जीवन अवघे आणखी सुंदर करु पुस्तक हाती धरु गड्यांनो पुस्तक हाती धरु! सध्याचे युग हे जीवघेणी स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन उंच भरारी घेतली पाहिजे. पुस्तकांना मित्र करुन ज्ञानाच्या या सामर्थ्याने विजयाचे खरे नायक होऊ असेही कवी लिहितो. पुस्तक माझे डोळे झाले पुस्तक माझा मेंदू करु साधना ज्ञानरुपाची चंचल मन हे बांधू ज्ञानाच्या या सामर्थाने विजयी नायक ठरू.. सुंदर आहे जीवन अवघे आणखी सुंदर करु.. बालमनाला हळूहळू शाळेची ओढ लागते. आणि मुलं आनंदाने शिकू लागतात. रोजच्या शिक्षणातून मोठे होता येत. साक्षर होता येतं हे मुलांच्या मनात खोलवर रुजविण्याचा प्रयत्न कवी करतो आहे. पाठीवरती दफ्तर घेऊन शाळेत जाऊ चला रोज शिकूया नवीन काही मोठे होऊ चला शिक्षणातून अनेक गोष्टींचा अनुभव येत असतो. अनेक प्रश्न निर्माण होतात तर अनेक प्रश्नांची उत्तरे ही शिक्षणातून मिळतात. रानातल्या पानात प्राण कुठून येतो? अंधार गायब होऊन उजेड कसा येतो? हे विज्ञानाच्या चष्म्यातून आपण पाहू शकतो. तरच आपण आपल्या स्वप्नांचे आभाळ कवेत घेऊ शकतो.वैज्ञानीक दृष्टिकोन मुलांसमोर कवी ठेवतो आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतो हिरवे हिरवे रान रानामधल्या पानोपानी कुठून येतो प्राण? विज्ञानाच्या चष्म्यातून जग हे पाहू चला पाठीवरती दफ्तर घेऊन शाळेत जाऊ चला.. असा थोडासा शाळेचा लळा लागला असतानाच शासनाने आपले धोरण जाहीर करून मराठी शाळा बंद पाडाव्यात आणि त्याची झळ या चिमुकल्या बालकांच्या मनावर बसावी. ही चटका लावणारी कविता या संग्रहात आहे. आता कुठे हो जमू लागली हाती पेन्सील धरु माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करु! शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून मुलं ही हैराण होतात. तरी आम्ही गुमान शाळेत जात आहोत. तुम्ही शाळा बंद केली तर घाम गाळणा-या बापासोबत नांगर मारायला जावं लागतं. शिक्षण हे आमच्या हक्काचे आहे. आम्हाला शिकु द्या. अशी हाक आणि विनंती करणा-या मुलांची व्यथा कवी कवितेतून मांडतो आहे. थडी भरूनी नदी वाहते पक्का रस्ता नाही जाऊ कसे परगावी शाळेत दिशा हरवल्या दाही कोण दावील दिशा आम्हा कोण आमचा गुरु.. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करु! आपल्या मुलांनी आपले स्वप्न साकार करावे ही प्रत्येक आई वडीलांची अपेक्षा असते. ठायी ठायी चिंता करू लागतात. मी कासवाच्या गतीने चाललो आहे. तेंव्हा डाँक्टर कसा होऊ? ही मुलांना ही चिंता कशी असते. ते कवी लिहितो. सुर्याआधी भल्या पहाटे उठलो पाहिजे मी लगेच पुन्हा अभ्यासाला बसलो पाहिजे मी साखर झोप, गोड स्वप्न काही नाही नाही कसे होईल माझे त्यांना चिंता ठायी ठायी! काही मुलांना शिक्षणाची आवड असते पण घरातली परिस्थिती त्या कोवळ्या मुलांना शिकू देत नाही. कच-याच्या झोळ्या काखेत घेऊन कचरा गोळा करणारी मुलं शाळेच्या शेजारी उभा टाकून वर्गातल्या मुलांकडे पाहत आपणासही असं शाळेत येता आलं तर? असा उराशी प्रश्न बाळगून आईला विनंती करणारी असंख्य बालके पहायला मिळतात. अंगावरच्या मळकट कळकट कपड्यांचा कंटाळा, कचरा वेचण्याचा कंटाळा, आतातरी आई मला सन्मानाने जगण्यासाठी कचरा नको तर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे.. असा मुलगा म्हणतो . ही कविता वाचतांना आणि कार्यक्रमात ऐकतांना रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी येते. कवीने अशा शाळाबाह्य हातावरचे पोट घेऊन जगणा-या मुलांची वास्तविक व्यथा कवी गणेश घुले यांनी मांडली आहे. कचरा झोळी नको ग आई दफ्तर घेऊ दे अक्षर अक्षर वेचायाला शाळेत जाऊ दे! पहाटेपासून दारोदारी कचरा वेचतो आपण मळकट होती कपडे कळकट होतो आपण मळकट कळकट जगणे आपुले सुंदर होऊ दे...! शाळा सुद्धा आपल्यासारखी वागत असते छान डोक्यामधल्या अज्ञानाची काढत असते घाण या कच-याचच्या झोळीमध्ये पुस्तक येऊ दे.. अक्षर अक्षर वेचायाला शाळेत जाऊ दे..! आधी जीवांचा पाचोळा मग कचरा होतो गोळा आपले जगणे हे बैलाचे इतरांसाठी पोळा सन्मानाने जगण्यासाठी साक्षर होऊ दे.. अक्षर अक्षर वेचायाला शाळेत जाऊ दे...! मुलं ही चंचल मनाची असतात. सरांना ते म्हणतात असे शिकवा की सगळा कंटाळा निघून जावा. यावरुन मुलांना आनंदी हसत खेळत शिक्षणाची गरज आहे. अवघड विषयांची कधीच भीती वाटू नये. टीवी सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे असे बालक कसे म्हणतात ते कवी लिहितो. सर, तुम्ही शाळेतमध्ये असे काही शिकवा पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा! टीव्ही सारखी पुस्तकांची, गोडी लागली पाहिजे गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे मातीमध्ये पिकते तसे मनामध्ये पिकवा.. पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा....! शाळेत मला माझ्या मँडम मला ढ म्हणतात. इंग्रजी चे अवघड शब्द आणि पाढे बिनचूक कसे मला म्हणता येईल? सांगना आई असे मुलगा आईला म्हणतो. शाळेत मँडमचे आणि घरात बाबाचे टोमणे मला खावे लागतात. मी पास होईल का याची मला सारखी चिंता वाटते. पहिल्या बाकावर मी केंव्हा बसेन आई असा प्रश्न उपस्थित करणारी आणि वास्तव मांडणारी कविता कवी लिहितो. ढ म्हणतात मलाच का वर्गामधल्या बाई कसा शिकू मी शाळेमध्ये सांग ना ग आई! पहिल्या बाकावरती मला बसता येईल कधी? माझ्यावरचा ढ चा शिक्का पुसता येईल कधी? अभ्यासाने अज्ञानाची करेन मी भरपाई.. कसा शिकू मी शाळेमध्ये सांग ना ग आई...? मुले शिकतात मोठी होतात आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आपल्या बालपणातील गावाकडच्या आठवणी, गुरूजी आणि शाळा .ही मुलं म्हणतात, गुरुजी तुम्ही कान पकडून छडी मारला नसता तर माझ्या आयुष्याची घडीच बसली नसती. सर तुम्ही आम्हाला इतके दिलात की, माणूस केलात. माणुसकीचे दर्शन शाळा आणि गुरुजीमध्ये कसे दिसते हे कवी लिहितो आहे. जर का तुम्ही सर, मारली नसती छडी कधीच माझ्या आयुष्याची, बसली नसती घडी तेंव्हा तुम्ही माझा धरला नसता कान रोज रोज अभ्यासाचा दिला नसता ताण यशाच्या दाराची उघडली नसती कडी... इतके दिले, इतके दिले, इतके दिले मला सर, तुम्ही शेवटी माणूस केले मला तुमच्यामुळेच आली या जिंदगीला गोडी.. जर का तुम्ही सर मारली नसती छडी... काळानुसार आता सगळं बदलत आहे याची जाणीव मुलांना कवी करुन देतो आहे. आता फळा ही बदलतो आहे आणि शाळाही बदलते आहे. धनिकांच्या हातात शाळा जाऊन बसल्या आहेत. शाळेचे मैदान मोकळे दिसत नाही. जीवघेणी स्पर्धा आणि दफ्तरांच्या ओझ्याखाली मुलांचा श्वास कोंडला जात आहे. डोनेशच्या शक्तीची वसुली ही शिक्षणाची दुकानदारी काही केल्या आता थांबत नाही ही खंत कवी आपल्या कवितेतून परखडपणे मांडतो आहे. डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या मँडम गुरुजींचे सर झाले शाळेच्या फीची नोटीस गरिबाच्या पोटी गोळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा.. अमिर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले जीव घेण्या स्पर्धेपायी दफ्तरांचे ओझे नडले शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा... माजले गवत लोभाचे विद्येचा सुकला मळा.. असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा..! कवी आपल्या कवितेतून निसर्गाचे दर्शन ही मुलांना घडवून आणतो आहे. रंगी बेरंगी फुलांना, झ-यांना, पानांना, पक्षांना, फुलपाखरुंना भेटूया, हिरवा हिरव्या मखमली गवतावरी लोळू या, वादळ वा-यांशी बोलू या. पुस्तके बाजूला सारून थोडासा आनंद घेऊया असे कविला वाटते. निसर्गाने ब-याच गोष्टी आपणास शिकवल्या आहेत. पक्षांनी आपापल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. मुलांना जसे कोडे पडते तसे कवी मनालाही कोडे पडते आहे. चिमणीचे उदाहरण देऊन कवी मुलांना सांगतो आहे. मऊ मुलायम नाजुक काड्या शोधून आणते कशी इतका रेखीव सुंदर खोपा चिमणी विनते कशी? जीव टांगतो फांदीला तेंव्हा जगणे कळते अंगभूत शिक्षण जगण्याचे नक्की इथेच मिळते पाटी, दफ्तर शाळेशिवाय हुशार बनते कशी? पक्षांकडून मेहनत, जिद्द, प्रयत्न आणि जगणं शिकता येते हे मुल्य कवी बालमनात रुजविण्याचा प्रयत्न करतो आहे. इवल्या अंगी एवढी मोठी उर्जा कशी येते, वादळ वारा यांना तोंड देत जीवन जगत असते. तर पावसांचे वर्णन करताना कवी म्हणतो. ज्यांना वाटते पाऊस यावा त्यांनी लगेच झाडे लावा ! आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. माणुसकीचे दर्शन घडत नाही. आई वडीलांना आपल्या मुलांसोबत खेळायला, बोलायला, गप्पा मारायला, गोष्टी सांगायला अजिबात वेळ मिळत नाही. मुलांना शाळा आणि अभ्यासाचा कंटाळा सारखा येत असल्याने मुलांच्या चेह-यावरचे आनंदी हसू हिरावले गेले आहे. आई बाबांच्या हातातून मोबाईल काही केल्या सुटत नाही. मोबाईल हे त्यांचे बाळ झाले आहे. म्हणून पुढच्या जन्मी मला मोबाईल होऊदे. आणि बाबांच्या सहवासात मला कायमचे राहू दे अशी प्रार्थना मुलं आज करत असल्याचे वास्तविक दुःख कवी आपल्या कवितेतून मांडतो आहे.कवींची ही मोबाईल नावाची कविता संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. सोबत तुमच्या नेहमी मोबाईल असतो केवळ घरी आल्यावर तरी घ्या ना मला जवळ रात्रभर हा मोबाईल असतो तुमच्या उशाला तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवता कशाला? दिवसभर मोबाईल तुम्ही हाती धरता माझे बोट धरून सांगा केंव्हा फिरता? देवा, मला पुढच्या जन्मी मोबाईल होता यावे दिवसभर पप्पा सोबत मला राहता यावे बालकांचे हे बोल ऐकून मन सुन्न होते. इतका खोलवर कवीनी मुलांच्या मनातील भावविश्वाचे स्पंदने उलगडलेला आहे. अतिशय सुरेख आणि सुंदर चिंतन करायला लावणारी कविता गणेश घुले यांनी लिहलेल्या आहेत. सोपी भाषाशैली, गेयता आणि आशय यामुळे कवितेची उंची वाढली आहे. गावकुसातील आठवणींना उजाळा देत शाळेच्या अंगणातून प्रवास करत ही कविता मना मनाचा ठाव घेत व्यक्त होऊ पाहते आहे. ज्यांच्या मुळे आपण लिहिते झालो त्यांच्या बद्दलचा मोठेपणा कवी विसरु शकत नाही. गेणू शिंदे, पी. विठ्ठल, कैलास अंभुरे, विजया वाड, किरण केंद्रे व त्यांची संगीत टीम याच्यामुळे मी कवी झालो. हा कवीचा मोठेपणा आहे. डॉ. विजया वाड यांनी या कवितांना सुंदर शब्दात आशयात्मक शुभेच्छा दिल्या आहेत. पुंडलिक वझे यांनी सुंदर चित्रे व मुखपृष्ठ रेखाटले आहे. बालमनाशी दोस्ती करु पाहणा-या कवी गणेश घुले यांच्या पुढील लेखनास व संगीतमय कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा! प्रा. रामदास केदार ९८५०३६७१८५ सुंदर माझी शाळा (बालकविता) कवी -गणेश घुले ग्रंथाली प्रकाशन, मुंबई पृष्ठे :६०,किंमत १०० रु. Attachments area
|
मुलांना शाळेची ओढ निर्माण कराय लावणारी बालकविता : सुंदर माझी शाळा